ड्रोनआणि क्वाडकॉप्टर
ड्रोन आणि क्वाडकॉप्टर हे दोन्ही अनमॅनड एरीयल व्हेहिकल (UAV) म्हणजे मानवविरहित हवेतून चालणारी वहाने या प्रकारात मोडतात. ड्रोन आणि क्वाडकॉप्टर दोन्ही माणसाशिवाय हवेत उडणारी वाहने आहेत. यांना रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने नियंत्रित करता येते. यांच्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर केलेला असतो. जो रिमोट कंट्रोलच्या नियंत्रणाखाली काम करतो.
| | |
आजकाल क्वाडकॉप्टरलाच ड्रोन या नावाने ओळखले जाते. तरीही ड्रोन आणि क्वाडकॉप्टर यांच्यामध्ये काही महत्वाचे फरक आहेत – ड्रोन हे विमानासारखे दिसतात. ड्रोनमध्ये विमानाच्या उड्डाण तत्वाचा वापर केलेला असतो तर क्वाडकॉप्टरमध्ये हेलीकॉप्टरच्या. ड्रोनमध्ये हवेमध्ये उडण्यासाठी इंजिनचा वापर केला जातो. ड्रोन हवेत खूप वेळ उडत राहू शकतात. ड्रोन जागेवर उड्डाण करू शकत नाही त्याला धावपट्टीची गरज असते. ड्रोनचे इंधन संपले तरी कुशल पायलट त्याला तरंगवत त्याला कमीत कमी नुकसान होईल अशा प्रकारे जमिनीवर उतरवू शकतो. याउलट क्वाडकॉप्टरला हवेत उडण्यासाठी पंखे असतात. क्वाडकॉप्टर हे बॅटरीच्या उर्जेवर चालते. त्यामुळे क्वाडकॉप्टर हे हवेत जास्त वेळ राहू शकत नाही. क्वाडकॉप्टरहे जागेवरूनच उड्डाण करू शकते त्यामुळे त्याला धावपट्टीची गरज लागत नाही. क्वाडकॉप्टरमध्ये हवेत असताना काही बिघाड झाला तर ते जमिनीवर आदळून त्याचे जास्त नुकसान होते.
लॅटिन भाषेतील क्वाड या शब्दाचा अर्थ चार असा आहे .क्वाडकॉप्टरला चार मोटर असतात. या मोटरीचा रोटर म्हणजे फिरणारा भाग हा बाहेरच्या बाजूला असतो. प्रत्येक रोटरवर एक पंखा लावलेला असतो म्हणून याला क्वाडकॉप्टर किंवा क्वाडरोटर असेही म्हणतात. या पंख्यांना प्रोपेलर म्हणतात . आपण इथून पुढे या पंख्यांना प्रोपेलर असेच म्हणू.
याच प्रकारे दोन प्रोपेलर असणारे बायकॉप्टर, तीन प्रोपेलर असणारे ट्रायकॉप्टर , पाच प्रोपेलर असणारे पेंटाकॉप्टर , सहा प्रोपेलर असणारे हेक्साकॉप्टर आणि आठ प्रोपेलर असणारे ओक्टोकॉप्टर बाजारात उपलब्ध आहेत. पण यापैकी क्वाडकॉप्टर आणि हेक्साकॉप्टर यांचा वापर जास्त करून होतो.
क्वाडकॉप्टरचे प्रकार:
टॉय ड्रोन : हे अतिशय लहान आकाराचे क्वाडकॉप्टर असतात . हे स्वस्त आणि लहान मुलांना खेळण्यासाठी वापरले जातात. या ड्रोनच्या सहाय्याने क्वाडकॉप्टरचे नियंत्रण करणे शिकता येते.
हॉबी ड्रोन :हे मध्यम आकाराचे क्वाडकॉप्टर असतात. हौशी लोकासाठी क्वाडकॉप्टरची जोडणी आणि नियंत्रण शिकणेसाठी एकदम उपयुक्त . याचे सर्व पार्ट वेगवेगळे मिळतात .या पार्टबरोबर मिळालेले माहिती पत्रक वाचून ते जोडता येतात. थोड्या अनुभवाने हे बऱ्यापैकी नियंत्रित करता येतात. याच्यावर एखादा कॅमेरापण लावता येतो.
प्रोफेशनल ड्रोन: हे तयार मिळतात.याचा उपयोग व्यावसायिक चित्रणासाठी केला जातो. याला चार किंवा त्यापेक्षा जास्त पंखे असतात. याच्यावर हाय डेफीनेशन (एच.डी.) कॅमेरा बसविलेला असतो. याचा उपयोग अवकाशातून फोटो काढणे, शुटींग करणे यासाठी केला जातो. याच्यामध्ये इतर बरीच वैशिष्ठे असतात, हे बऱ्यापैकी स्थिर राहू शकतात. आणि बराच वेळ हवेत राहू शकतात.
सेल्फी ड्रोन: हे एक प्रकारचे उडते कॅमेरे असतात. याचा उपयोग सेल्फी काढण्यासाठी केला जातो. आकाराने लहान, वजनाने हलके आणि अगदी पाठीवरच्या बॅगमध्ये मावणारे असल्याने ट्रेकिंग वगैरे करणाऱ्या हौशी लोकात हे खूपच लोकप्रिय आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला असतो. हे आपल्या मालकाला ओळखू शकतात त्याचे हाताचे इशारे ओळखू शकतात,काही ड्रोन तर चक्क फोटो काढून सोशल मिडीयावर शेअर करू शकतात.
रेसिंग ड्रोन.: हे शर्यतीसाठी वापरले जातात.आकाराने लहान पण अतिशय चपळ असे हे ड्रोन असतात. त्याला उच्च प्रतीचे कॅमेरे लावलेले असतात. हे कॅमेरे जलद गतीने विडीओ पाठवतात त्यामुळे शर्यत चालू असताना वेगवेगळे अडथळे पार करणे सोपे जाते.




