अभ्यासक्रम आणि मानवी उत्क्रांतीशी स्पर्धा
OUT OF BOX Thinking
आज जे शिक्षण क्षेत्रात सगळीकडे जे प्रयोग चालले आहेत ते पाहिलं तर अशी भीती वाटते कि हे प्रयोग करणारे शिक्षण तज्ञ खरोखरच काही विचार करतात का ? त्यापेक्षा वाईट म्हणजे कुठलाही विचार करता ‘अहो रूपम , अहो ध्वनी’ म्हणून विचार न करता लगेच त्या प्रयोगाला डोक्यावर घेणारी जी जमात आहे, त्यांना हे कळत का कि याचे परिणाम पुढ त्यांच्याच पिढीला भोगायला लागणार आहे .
मानव ज्यावेळी पृथ्वीवर अस्तित्वात आला त्यावेळेपासून आजच्या या अवस्थेला यायला लाखो वर्षे लागली . मानवाचा मेंदू वेगवेगळ्या अनुभवला तोंड देत हळूहळू उत्क्रांत होत गेला . एक एक ज्ञानशाखा सुरु व्हायला अगदी अलीकडच्या दहा हजार वर्षापासून सुरुवात झाली . कला , वाणिज्य , विज्ञान आणि अगदी अलीकडे अस्तित्वात आलेल्या तंत्राशाखा. आज जर पाहिलं निर्माण होणाऱ्या तर ज्ञान आणि माहितीचा वेग हा अगदी घातांकीय (Exponential ) वेगात वाढत चालला आहे . प्रत्येक क्षेत्रात होणारी अवाढव्य प्रगती पाहिली तर त्यामानाने माणसाच्या मेंदूमध्ये होणारी वाढ आणि मेंदूचा होणारा विकास हा अगदी नगण्य आहे.
मेंदू आणि मेंदूच्या विकासाचा वेग ध्यानात न घेता निव्वळ फार्स करून पैसा कमवायची एक नवीनच प्रथा शिक्षण क्षेत्रात सुरु झाली आहे . २०१० पासुन जर तुम्ही पाहिले तर मुलांच्या बुद्धीमतेचा जर अंदाज घेतला तर त्यामध्ये वाढ होण्याऐवजी कमतरता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे . याला कारण कि ज्ञानात निर्माण होणारी विविधता आणि त्याचबरोबर मेंदूची वेगवेगळ्या कार्यामध्ये होणारी विभागणी वाढत आहे . त्यामुळे प्रत्येक विषयावर होणाऱ्या विचाराची खोली कमी होत चालली आहे. आजचे विद्यार्थी जरी तंत्रज्ञान हाताळणे यामध्ये कुशल असली तरी त्यांच्या बुद्धीच्या किंवा मेंदूच्या वाढीत काहीही बदल झालेला नाही.तसेच निरीक्षण , चिंतन अनुभवाच्या आधारे अनुकरण आणि शेवटी अवलंबन या ज्या मेंदूच्या शिकण्याच्या पायऱ्या आहेत त्यामध्येही अजुन बदल झालेला नाही .
मुलांच्या मध्ये संशोधकता , विचार करण्याची प्रवृत्ती वाढवायची असेल तर त्यांच्या मेंदूला विचार करायला पुरेसा वेळ दिला पाहिजे . त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी अभ्यासक्रमात जागा ठेवल्या पाहिजेत पण या ऐवजी त्यांच्या अभ्यासक्रमात अकारण वाढत जाणारे विषय , मेजरच्या बरोबर डोंबलावर पडणारे मायनरचे अधिकचे विषय , निष्कारण वाढवलेले वेगवेगळ्या प्रोजेक्टचे ओझे , वेगवेगळे बनवायचे रिपोर्ट , वेगवेगळी क्रेडीट याखाली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता घुसमटून जात आहे. काही विषय असे आहेत कि त्यांची शिकवण्यापूर्वी पूर्वतयारी करायसाठी लागणारे विषय हे एक तर अभ्यासक्रमात नाहीत किंवा ते विषय नंतर पुढ कधीतरी घेतला जातो . विषयाची गुंफण चुकत चालली आहे आणि इतर अनेक गोष्टींचा विद्यार्थ्यावर होणारा भडीमार वाढत चालला आहे .
आपले विद्यार्थी, त्यांची आर्थिक , सामाजिक परिस्थिती ,आपल्याकडे गेल्या शंभर वर्षापासून आलेली शिक्षण पद्धती याचा विचार न करता कुठल्यातरी पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा अचानक करत असलेला अवलंब . क्रांतिकारक बदलाच्या नावाखाली शिक्षणात होत जाणारे बदल हे देशातील शिक्षण हळूहळू संपवून टाकेलं काय अशी मला भीती वाटत आहे . अर्थात शिक्षण हे कधी संपत नाही पण काही काळाने मागे अवश्य ढकलले जाऊ शकते .
मानवाचे जन्मापासून त्याच्या मेंदूमध्ये होणारे बदल याच्या वेगामध्ये बदल झालेला नाही .पण हे सगळ लक्षात न घेता आज जे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करण्याचा घाट घातला आहेत त्याला पाहिले तर अस वाटत कि मानवाच्या उत्क्रांतीच्या वेगाशी चाललेली शिक्षण क्षेत्राची स्पर्धा देशाला कुठ घेऊन जाणार ?




